रक्तदाता दिनानिमित्त रत्नागिरीत जागृती फेरी

रत्नागिरी : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिवसानिमित्त शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्यावतीने राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत जनजागृती फेरी काढण्यात आली.

रत्नागिरीत काढलेल्या या फेरीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक अरूण कुमार जैन, यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी, शिर्के हायस्कूलचे प्राध्यापक, स्काउट गाइडचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. या प्रसंगी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुतार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना रक्तपेढी केंद्राच्या कामाचे स्वरूप व वार्षिक रक्त संकलन आणि रक्तपुरवठा याची माहिती दिली. रक्तपेढी केंद्रामार्फत ९० टक्के रुग्णांना वार्षिक रक्तपुरवठा मोफत केला जातो. रक्तविघटन केंद्राची माहिती त्यांनी सर्वांना दिली. रक्तदानाचे फायदे सांगून रक्तदात्यांमधील भीती व शंका दूर केल्या. त्यानंतर रक्तदानाविषयी सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी रक्तदान शपथ घेतली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी रक्तदान करण्यास या, असे आवाहन केले.

पथनाट्य, ढोलपथक ठरले लक्षणीय

रत्नागिरी शहरातील बसस्थानक येथे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच शिर्के हायस्कूलच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांचे ढोलपथक या फेरीचे विशेष आकर्षण ठरले. फेरी समाप्तीवेळी विनोद पावरा यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 04-10-2024