पती घराबाहेर गेला असता दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल
मंडणगड:
भिंगळोली आदिवासीवाडीत महिलेची आत्महत्या झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना मंडणगड तालुक्यात उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत एका विवाहित महिलेने राहत्या घरी लोखंडी भालाला नायलॉनची रस्सी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना २३ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साप हाकलण्यासाठी पती घराबाहेर गेला अन् घडला अनर्थ
मृत महिलेचे नाव सौ. अर्चना हरिश्चंद्र जाधव असे आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अर्चना यांचे पती हरिश्चंद्र शंकर जाधव हे घराच्या परिसरात आलेला एक साप हाकलण्यासाठी घराबाहेर गेले होते. पती बाहेर गेल्याची संधी साधून दारूच्या नशेत असलेल्या अर्चना यांनी घरातील एका लोखंडी भालाला नायलॉनची रस्सी बांधली आणि गळफास लावून घेतला.
पतीने घरी परतल्यावर पाहिला धक्कादायक प्रकार
पती हरिश्चंद्र जाधव हे सापाला घरापासून दूर हाकलून काही वेळातच परत आले असता, त्यांना पत्नी अर्चना यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंडणगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी २४ जुलै रोजी सकाळी १०:१९ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ.क्र. १४/२०२६) करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:25 27-07-2026














