मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा थांबा धडक अपघातानंतर बिकट अवस्थेत; नवीन सुसज्ज बस शेडची ग्रामस्थांची मागणी
सावर्डे :
सावर्डे बस थांबा दुरुस्ती रखडल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या महत्त्वाच्या थांब्यावर प्रवाशांना वर्षभरापासून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल अधिकच तीव्र झाले असून, संबंधित यंत्रणेने तातडीने याकडे लक्ष देऊन नवीन सुसज्ज बस थांबा उभारावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.
भरधाव लक्झरी बसच्या धडकेत झाले होते नुकसान
वर्षभरापूर्वी मुंबईहून येणाऱ्या एका भरधाव लक्झरी बसने नियंत्रण गमावून दुभाजक ओलांडत विरुद्ध मार्गावरील या बस थांब्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात बस थांब्याचे पिकअप शेड पार वाकले, पत्रे तुटले आणि शेजारील स्ट्रीट लाईटचा विद्युत पोलही जमिनीवर कोसळला. हा अपघात पहाटेच्या वेळी घडल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली होती, मात्र बस थांब्याचे प्रचंड नुकसान झाले होते.
गंजलेले खांब अन् कचऱ्याचे साम्राज्य; धोकादायक परिस्थिती
अपघातानंतर वर्षभर उलटूनही या थांब्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सध्या बस थांब्याचे लोखंडी खांब पूर्णपणे गंजले असून शेडचे पत्रे फाटले आहेत. बसण्यासाठीचे बाक मोडकळीस आले असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्याहून गंभीर म्हणजे, कोसळलेल्या विद्युत पोलचा केवळ चौथरा आणि उघड्या लोखंडी सळ्या शिल्लक असल्याने रात्रीच्या वेळी येथे भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
प्लास्टिक आणि फाटक्या कापडाचा तात्पुरता आधार
पावसापासून बचाव करण्यासाठी स्थानिकांनी फाटका कपडा आणि प्लास्टिक बांधून तात्पुरती सोय केली आहे. सावर्डे हा मुंबई, पुणे, रत्नागिरीसह विविध मार्गांवरील एसटी व खासगी बसांसाठी अत्यंत महत्त्वाचा थांबा आहे. दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या बस थांब्याचा वापर करतात. मात्र, पडक्या शेडमुळे विशेषतः पावसाळ्यात सर्वांचेच अतोनात हाल होत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुसज्ज थांब्याची मागणी
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने दखल घेऊन सावर्डे येथे नवीन सुसज्ज बस थांबा उभारावा, लाईटची योग्य व्यवस्था करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:25 27-07-2026














