अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
पुणे :
चौथी-सातवी शिष्यवृत्ती निकाल अखेर घोषित झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) यांचा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल परिषदेच्या [https://www.mscepune.in](https://www.mscepune.in) व [https://2026-2.puppssmsce.in](https://2026-2.puppssmsce.in) या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. तसेच, शाळांना आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या स्कूल लॉगिनमधून उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन गुणपडताळणीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदत
विद्यार्थ्यांना किंवा पालकांना मिळालेल्या गुणांची पडताळणी (Scrutiny) करून घ्यायची असल्यास, संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २५ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रति पेपर ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून, ही रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
नाव आणि माहितीतील दुरुस्तीसाठीही अर्ज प्रक्रिया सुरू
गुणपडताळणीसोबतच विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव किंवा इतर वैयक्तिक माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी देखील संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये २ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने पालकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 27-07-2026














