खेड : तालुक्यातील सुकवली येथे बुधवारी दि. ५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन्ही वाहनातील विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
खेडमध्ये बुधवारी ५ रोजी सायंकाळी टेम्पो ट्रॅव्हलर बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सुकिवली येथील रेल्वे पुलाजवळ थांबली होती. यावेळी स्कूलबसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्यामुळे अपघात घडला. या भीषण धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, बसमधील आणि रिक्षातील विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.
या अपघाता सार्थक मनवळ, स्वरूप गुजर, साई मोरे, विराज गवाडे हे गंभीर जखमी झाले. दीपक माने या विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली. शहरातील दोन नामांकित शाळांचे शिक्षक, शाळेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
पालकांमध्ये घबराट …
या घटनेने पालकांमध्ये घबराट पसरली होती. शाळेच्या बसेस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे असणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून होत आहे.
असुरक्षित वाहनांमधून विद्यार्थ्यांचा प्रवास
या अपघातानंतर एक गंभीर बाब समोर आली आहे. खेड शहरात धावणाऱ्या अनेक स्कूल बसेस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे ना योग्य कागदपत्रे आहेत, ना विमा, आणि ना वाहतूक परवाने. काही वाहनचालकांकडे बस चालवण्याचा अधिकृत परवाना देखील नाही, ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर अनेक शाळा व संस्थाचालक या नियमांकडे दुर्लक्ष करत असून, विद्यार्थी अशा असुरक्षित वाहनांमध्ये प्रवास करत असल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 06/Mar/2025














