चिपळूण : शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील बहादूरशेख नाका ते नगरपरिषद तसेच चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे १५ मीटर रूंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ९६ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी माहिती न.प.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
अंरूद रस्ते व सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांसह बाजारपेठेला बसत आहे. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांचे किमान १५ मिटर रूंदीकरण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. याआधी २००६ व २०११ दरम्यान रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न करण्यात आला होता.
तत्कालीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी विजय राठोड यांनी अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुख्याधिकारी नयन ससाणे यांच्या कारकिर्दीत रस्त्याच्या दुतर्फा ५ फूटापर्यंतचे मार्किंग केले होते. मात्र तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर रस्ता रुंदीकणासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी, वाढती रहदारी व सततच्या वाहतूक कोंडीमुळे हा प्रश्न जठील बनला आहे.
याविषयी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वतः लक्ष घातले असून शहरातील बहादूरशेखनाका ते नगर परिषद, तसेच चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे १५ मीटर रूंदीकरण केले जाणार आहे. प्रत्यक्षात १० मीटर रस्ता वाहतुकीसाठी राहणार असून उर्वरित जागेत फुटपाथ, गटार व पाईपलाईनसाठी राखीव जागा राहणार आहे. याचबरोबर रुंदीकरणात रस्त्याच्या मधोमध दुभाजकची व्यवस्था केली जाणार आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी पाठविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या दोन महत्वाच्या रस्त्याबरोबरच मध्यवर्ती बसस्थानक ते खंड कोलखाजनकडे जाणाऱ्या नियोजीत रस्त्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या रस्त्यात शिवनदीवर पूल उभारावा लागणार असल्याने त्याचेही नियोजन केले आहे.
याशिवाय शहरातील खेडेकर क्रीडा संकूल नजीकचा १९९६ मध्ये उभारलेला शिवनदी पूल देखील अरूंद असल्याने तोही रूंदीकरणात नव्याने उभारला जाणार आहे. या सर्व कामांसाठी एकत्रितपणे सुमारे ९६ कोटीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे सादर केला आहे.
येत्या काही दिवसात त्याला तांत्रिक मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया तातडीने राबवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 06/Mar/2025














