रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत जिल्ह्यातील ४ महिला सरपंचांनी सहभाग घेतला.
त्यात निवळी, आबलोली, मोरवणे, घोडवली सरपंचांचा समावेश आहे. सरपंचांनी कसे काम करावे, त्यांचे हक्क काय आहेत याची माहिती मिळाल्याचे समाधान सहभागी महिलांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ४ व ५ मार्चला त्रिस्तरीय कार्यशाळा झाली. यामध्ये निवळी ग्रामपंचायतीच्या सरपंच तन्वी कोकजे, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, चिपळूण मोरवणे सरपंच संचिता जाधव, संगमेश्वर तालुक्यातील घोडवलीतील सरपंज वैदही बाणे या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी संजय गोसावी हे उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४ वर्षामध्ये अतिउत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रातून रत्नागिरीसह सोलापूर, नाशिक, लातूर, अमरावती, वर्धा यांची निवड झाली आहे. याबाबत पंचायतराज संचालक गिरीश भालेराव यांनी कौतुक केले.
दिल्लीत झालेल्या अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. महिला सरपंचांनी कसे काम करावे आणि त्याचे हक्क आणि अधिकारांचा वापर कसा करावा या विषयी माहिती मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण, हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय आहे. राज्यातील वेगवेगळ्या महिला सरपंचांना भेटण्याची संधी मिळाली. विचारांची देवाणघेवाण झाली. त्यांची संस्कृती आणि काम करण्याची पद्धत आत्मसात करता आल्या. – तन्वी कोकजे, सरपंच, निवळी ग्रामपंचायत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 06-03-2025














