कडमवाडीतील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर पोलिसांचा छापा; सोनोग्राफी मशीन, औषधे जप्त आणि एजंट महिलांसह चौघांना अटक
कोल्हापूर: Kolhapur Abortion Racket अंतर्गत प्राप्त माहितीनुसार, शासकीय सेवेतून सिव्हिल सर्जन (जिल्हा शल्यचिकित्सक) पदावरून निवृत्त झालेल्या सत्तर वर्षीय डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड याने बेकायदेशीर गर्भपात करत २५० हून अधिक स्त्रीभ्रूण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कळंबा गर्भलिंग चाचणी प्रकरणात करवीर पोलिसांनी कारवाई करत कडमवाडी (रत्नागिरी रोड, लिषा हॉटेलजवळ) येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’ चालवणाऱ्या डॉ. गायकवाडच्या आवळल्या मुसक्या आहेत. गेल्या दीड वर्षांत २५० हून अधिक महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली स्वतः डॉ. गायकवाडने पोलिसांना दिली आहे.
रत्नागिरीचा माजी जिल्हा शल्यचिकित्सकच निघाला सूत्रधार रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सेवा बजावलेला डॉ. चंद्रकांत गायकवाड १० वर्षांपूर्वी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाला होता. सेवेत असताना गर्भलिंग चाचणी आणि अवैध गर्भपाताविरोधात मोहिमा राबवणाऱ्या डॉ. गायकवाडने निवृत्तीनंतर कडमवाडी येथे ‘प्रतिमा हॉस्पिटल’ सुरू केले. गेल्या ४ वर्षांपासून तो बेकायदेशीर गर्भपाताचा धंदा करत असून, गेल्या दीड वर्षांत त्याने २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथकाकडून बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री कडमवाडी येथील प्रतिमा हॉस्पिटलवर छापा टाकला. पोलिसांनी एक बोगस महिला ग्राहक पाठवून गर्भलिंग निदान करायचे असून, मुलगी असल्यास तात्काळ गर्भपात करायचा असल्याचा बनाव रचला. डॉ. गायकवाडने तपासणी करून मुलगी असल्याचे सांगत गर्भपाताची प्रक्रिया सुरू करताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एजंट महिला आणि सोनोोग्राफी मशीन पुरवणारा डॉक्टरही अटकेत कळंबा येथील थ्रीस्टार लॉजवरील गर्भलिंग निदान प्रकरणात करवीर पोलिसांनी संशयित एजंट महिला – लीना उर्फ मनीषा दिनकर कांबळे (वय ३७, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) आणि अश्विनी गजानन शिंदे (३८, रा. कसबा ठाणे, ता. राधानगरी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत डॉ. चंद्रकांत गायकवाडचे नाव समोर आले.
याशिवाय, भोगावती कारखान्याच्या क्वार्टर्समध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर निदाणासाठी सोनोोग्राफी मशीन पुरवणाऱ्या बोगस डॉक्टर शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (वय ४०, रा. शिवगंगा अपार्टमेंट, इचलकरंजी) यालाही करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिल्ली येथील एका कंपनीकडून १.५ लाख रुपयांना घेतलेली मशीन बोगस डॉक्टर महेश पाटीलला ३ लाख रुपयांना विकली होती.
वैद्यकीय उपकरणे आणि १०० हून अधिक गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रतिमा हॉस्पिटलमधून पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोोग्राफी मशीन, वैद्यकीय उपकरणे आणि १०० हून अधिक एमटीपी (गर्भपाताच्या) गोळ्या जप्त केल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 31-07-2026













