गुहागरातील पर्यटन स्थळांचा मार्ग खड्डेमय

चिपळूण : गुहागरमध्ये मागील काही वर्षात पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी देखील उन्हाळी सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गुहागरमध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर काहींनी त्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. चिपळूण येथील गुहागर नाक्यातून सुरू झालेला रस्ता खड्डेमय बनला असतानाच खुद गुहागरमध्ये देखील जागोजागी खड्डे पडले आहेत.

या मार्गावरील वाहतूकदारांसह नागरिकही हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषतः दापोली, गुहागर, रत्नागिरी या भागात विस्तीर्ण समुद्रकिनारा असल्याने येथे पर्यटकांची नियमीत रेलचेल सुरू असते. पर्यटन ठिकाणी जाणे येण्यासाठी सुस्थितीत रस्ते असावेत, यादृष्टीने गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, आता हे काम अर्ध्यावरच रखडले आहे. गुहागर मोडकाआगर ते रामपूरपर्यंतच कॉक्रिटीकरणाच काम पूर्ण झाले आहे. मात्र त्या व्यतिरिक्त रस्ता अजूनही डांबरीकरणाचा आहे.

यातील मोडकाआगर ते गुहागर या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याठिकाणी खड्डा चुकवताना काही बाहनांचे अपघातही झाले आहेत. या भागात गेल्या तीन चार वर्षात रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. याशिवाय नव्याने केलेले कॉक्रिटीकरण देखील आता उखडू लागले आहे. कॉक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, ठिक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. चिपळूण हद्दीत देखील या मार्गावर काही ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. विशेषतः गुहागर नाका, उक्ताड, मार्गताम्हाणे या ठिकाणच्या सत्याला पडलेले खड्डे देखील डोकेदुखी बनले आहे.

उपहासात्मक फलक
सावधान, येथे तुमच्या मृत्यूची तयारी अधिकारी आणि ठेकेदारांनी केलेली आहे. सौजन्य यमदूत, अशा शब्दात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा फलक आता सोशल मीडियावर तितकाच व्हायलर झाला असून त्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 10/Mar/2025