संगमेश्वर : कसबा येथे उद्या धर्म रक्षण दिन

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे ११ मार्च रोजी सकल हिंदू समाज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म रक्षण दिनानिमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या देवरुख कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रसाद सावंत, अभिजित शेट्ये, सुधीर यशवंतराव उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सिंहाच्या छात्याची अलौकिक गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे व प्रमुख सादरकर्ते शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांच्यासह छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे विकी कौशल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव हे शंभूराजे पोवाडा सादर करणार आहेत. यासह अन्य काही उपक्रमही येथे राबवले जाणार आहेत.

शेवटी शंभू महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थित राहणार आहेत. धर्मरक्षक दिन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे ११ रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये सर्व हिंदू संघटना व शंभूराजे प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 10/Mar/2025