मंडणगड : शेवरे गावची प्रसिद्ध नवसेवाली बाय अशी ख्याती असलेली वरदानमाता देवी ढालकाठीवर विराजमान होऊन भक्तांच्या गावभेटीसाठी निघाली आहे. वेशीवरून नगाऱ्याच्या ठोक्याचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज कानी पडला की, गावोगावी एकच आवाज घुमतो, शेवरे गावाची वरदानमातेची ढालकाठी आली हो आली. तालुक्यातील एकमेव ही ढालकाठी मंडणगडच्या शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू आहे.
पन्नास फूट उंचीच्या ढालकाठीवर आरूड झालेली देवीची ५ मार्च रोजी मंदिरातून गावात मिरवणूक काढण्यात आलो. पूर्वी देवीची ८४ गावांतून मिरवणूक काढली जात होती; परंतु आता शक्य होईल तेवढ्या गावांतून खेळी देवीसह प्रवास करतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या तालुक्यातील ही एकमेव ढालकाठी असून, तिचे भ वितमय आकर्षण आहे.
गावपरिसरात वरदानदेवीचे पुरातन काळातील मंदिर असून, वरदानदेवी, मानाई, झोलाई, वाघजाई भैरी, चणकाई अशी पाच मंदिरे आहेत. शिमगोत्सवामध्ये दुसऱ्या होळीला ५० फूट उंच बांबूच्या काठी आणून तिथी पूजा करण्यात आली. इालकाठीला रंगीबेरंगी कपड्याने सजवून टोकावर चांदीचा कळस व गावदेवीचा भगवा ध्वज लावण्यात आला. परंपरेनुसार ढालकाठी वरदानदेवीच्या प्रांगणात उभी करून गावातील सर्व मंडळींसह देवीचे पुजारी देवीपूजन करून देवीला साकडे घालण्यात आले.
मंदिरातील देवीसमोरील एक फूल ढालकाठीजवळ आणून ढालकाठीची पूजा केल्याने देवी त्या ढालकाठीवर आरूढ होते, अशी श्रद्धा आहे. गावभेटीत सर्वप्रथम देवीला नायने गावी आगमन झाले.
देवीची खणानारळाने ओटी भरली जात आहे. डोंगरदऱ्या, पायवाटेने चालत येणाऱ्या देवीचे गावोगावी भक्तीभावाने स्वागत केले जात आहे. खणानारळने ओटी भरून देवीला नवस केले जात असून, जुने नवस फेडले जात आहेत. सात दिवसांच्या अहोरात्र प्रवासानंतर देवीचे ११ मार्च रोजी वाजतगाजत शेवरे गावात आगमन होणार आहे. दोन दिवस गावात देवीची घरोघरी भक्तीभावाने पूजा केली जाते.
अशी होते सख्ख्या बहिणींची भेट
वरदानदेवीची बहीण असलेल्या डौली गावातील जनाईदेवीची पालखी शेवरे गावात देवीच्या भेटीसाठी येते. दोन्ही सख्ख्या बहिणींची भेट घडवून आणली जाते. दहाव्या होळीच्या दिवशी गावातील होळी पाठवल्यानंतर वरदानदेवीला रात्री वाजतगाजत देवळातील सानेवर आणण्यात येणार आहे, दुसऱ्या दिवशी सानेवर बाळकाठीची मनोभावे पूजा करून साकडे घालण्यात येणार आहे. शेवटी एक फूल ग्रामदेवतेच्या देवळात नेले जाते म्हणजे देवी देवळात पुन्हा स्थानापन्न होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 10/Mar/2025












