खेड : बाल अत्याचार प्रकरणी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी प्रदीप बाळकृष्ण दळवी रा. वाडी, जैतापूर, ता. खेड, जि. रत्नागिरी यांस न्यायालयाने पोक्सो कायदा कलम ८ खाली दोषी घोषित करून ३ वर्षे सश्रम कारावास आणि रु. १०००/- दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, अशी शिक्षा अति. सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी ठोठावली.
याबाबत हकिकत अशी की, मौजे भोस्ते, ता. खेड येथे माहे जून २०१७मध्ये पीडिता घरी जात असता भोस्ते पुलाशेजारी पायवाटेवर आरोपीने पीडितेला फरफटत झाडीत नेवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत पीडितेने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ७साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष व कागदोपत्री पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याचे जाहीर केले. सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार वर्षा अरुण शिंदे सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 11/Mar/2025














