रत्नागिरी : गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेचे ३० मार्चला आयोजन; ७० चित्ररथ सहभागी होणार

रत्नागिरी : गुढीपाडव्याला ता. ३० मार्च रोजी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची पहिली बैठक रविवारी पतितपावन मंदिरात झाली. या प्रसंगी आयोजक ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान, पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, राममंदिर आदींसह ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ७० चित्ररथ आणि दहा हजारपेक्षा अधिक हिंदू बंधू-भगिनी स्वागतयात्रेत सहभागी होतील.

ग्राममंदिर श्री देव भैरी मंदिर ते – समाजमंदिर पतितपावन मंदिर या मार्गावर जल्लोषात स्वागतयात्रा निघेल, या प्रसंगी श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांनी सांगितले की, डोंबिवली येथील आबासाहेब पटवारी हे रत्नागिरीत आले होते. त्यांनी नववर्ष स्वागतयात्रेची संकल्पना – मांडली. त्या वेळी श्री भैरी देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष (कै.) अरूअप्पा जोशी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत २००५ मध्ये पहिली स्वागयात्रा सुरू झाली. बैठकीला श्री विठ्ठल मंदिरचे अध्यक्ष आनंद मराठे, राम मंदिराचे विश्वस्त सुधाकर सावंत, दीपक सुर्वे, भैरी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, सोमेश्वर शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे, बावा नाचणकर, उमेश खंडकर, साईजित शिवलकर, अमृतभाई पटेल, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण, प्रभाकर खानविलकर, बी. टी. मोरे, बावा पाटणकर आदी उपस्थित होते.

यात्रेचा मार्ग
श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागतयात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा खालची आळीमार्गे कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल, मारुती मंदिर येथून वरील भागातील रथांची स्वागतयात्रा माळनाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. दोन्ही यात्रा जयस्तंभावर एकत्र होऊन राम आळी, गाडीतळ येथून पतितपावन मंदिरात पोहोचतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 11/Mar/2025

Tata aeris