चिपळूण : कापरे-भेलवणेतील तलावासाठी जागा देणाऱ्या ७९७ शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला नाही

चिपळूण : तालुक्यातील कापरे भेलवणे येथील साठवण तलावाची खोदाई झाल्यानंतर ठेकेदाराला २२ कोटींचे बिल देण्यात आले. मात्र या तलावासाठी जागा देणाऱ्या ७९७ शेतकऱ्यांना एकही रुपया आजतागायत मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या संमत्तीपत्रानुसार जागा मोबदला न मिळाल्यास १ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

यासंदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने अवधुत मोरे, आरती भुर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे भूसंपादन कामकाज गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. या संदर्भात न्याय मागितल्यावर खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव करून भूसंपादन करावे, असे आदेश देत जानेवारी २०२४ मध्ये चिपळूण प्रांताधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला; मात्र सदर भूसंपादनात जाणूनबुजून व्यत्यय आणत आहेत. शंभर टक्के संमतीपत्र झाल्याशिवाय पुढील काम करता येत नसल्याचे सांगत आहेत. आजपर्यंत ७९७पैकी ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. १ मे २०२५ पूर्वी संमतीपत्र पूर्ण झालेल्यांना भूधारक शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, मृद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या कालावधीत भूसंपादन अपूर्ण ठेवल्याबद्दल व ठेकेदारास २२ कोटी १ लाख बिल अदा केल्याबद्दल त्या विभागीय चौकशी करावी, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, ऑक्टोबर २०१९ मध्ये जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ठेकेदाराला बिल देणाऱ्या संबंधित अधिकारी, ठेकेदारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल खातेनिहाय चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. त्या महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर सर्व शेतकरी बेमुदत उपोषणाला बसणार आहोत.

प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय
मुळातच जागा ताब्यात नसताना साठवण तलावाचे काम सुरू झाले. भूसंपादन प्रकिया रखडलेली असताना पुन्हा खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रारंभी शेतकऱ्यांनी होकार दिला. त्यानुसार ७९७पैकी ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. उर्वरितांमध्ये काही मयत, तर काही परदेशात आहेत. त्यामुळे अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ती संमतीपत्रे आवश्यक आहेत. वारस तपास आणि त्यामध्ये लागणारा वेळ, खरेदीपत्रासाठी येणारा खर्च या सर्वांमुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. एकीकडे खोदाईकामाचे २२ कोटी खर्च करून प्रकल्प रखडला असताना पुढील दिशा सापडत नसल्याने सारे हताश झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 11/Mar/2025