चिपळूण : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) शंभर विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. विशेष म्हणजे त्यात २२ मुलींनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
संस्थेमध्ये नॅब आय हॉस्पिटलतर्फे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत झालेल्या कार्यक्रमाला ५८० विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. नॅब आय हॉस्पिटलचे डॉ. पुष्कराज नारखेडे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. संदीप नलावडे यांनी त्यांना सहकार्य केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रीतम शेट्ये म्हणाले, अंधारलेल्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदानाच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते.
त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. उपप्राचार्य विजय वानखडे म्हणाले, नेत्रदान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे किंवा तिचे डोळे दुसऱ्या कोणाला तरी दान केले जाते. ज्यांचे डोळे कॉर्नियल इन्फेक्शनमुळे खराब झाले आहेत त्यांना नेत्रदानाचा फायदा होतो. ज्या लोकांना बुब्बुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे अशा लोकांना दृष्टी प्रदान करण्यासाठी नेत्रदानाचा टक्का वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रबोधनाची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. कार्यक्रम अधिकारी समीर पाणींद्र यांनी अंधत्वाची कारणे सांगितली. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 11/Mar/2025














