काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा रमेश कीर ?

रत्नागिरी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौर्‍याची माहिती देण्यासाठी आलेल्या प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ज्येष्ठ नेते रमेश कीर गळ्यात पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची माळ पडण्याचे संकेत दिले. काँग्रेस भवन येथे झालेल्या पक्षीय कार्यक्रमात कीर उपाध्यक्षांच्या उजव्या हाताच्या बाजुला बसले होते. यातून कीर यांनाच जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे.

कॉग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ 15 मार्च रोजी सिंधुदुर्ग तर 16 मार्च रोजी रत्नागिरी दौर्‍यावर येत आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पक्ष संघटन अडचणीत आहेत त्या जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्षांनी दौर्‍याचे नियोजन केले असल्याचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी विचारविनिमय केल्यानंतर उपाध्यक्ष पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळीही माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर उपाध्यक्षांच्या उजव्या हाताच्या बाजूला बसले होते. पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नांना प्रदेश उपाध्यक्ष ऐवजी रमेश कीरच बाजू मारुन नेत होते. यातूनही त्यांचीच जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागणार याचे संकेत मिळाले.

प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, सरचिटणीस रमेश शेट्टी यांच्या मंगळवारच्या दौर्‍यावेळी उपस्थित असलेले बहुसंख्य पदाधिकारी कीर गटाचेच दिसून येत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ऊर्फ बाळा मयेकर, दीपक राऊत, अशोक जाधव, अश्पाक कार्दी, रुपाली सावंत, अ‍ॅड. अश्विनी आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातूनच बाजूला करण्यात आले. तेव्हापासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 12-03-2025