चंद्रग्रहणाचा शिमगोत्सवावर परिणाम नाही : ज्योतिषी योगिनी जोशी

गुहागर : खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (ता. १४) भारतात दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक, आर्कटिक महासागर, पूर्व आशिया आणि अंटार्क्टिका या भागांत दिसेल. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम भारतातील उत्सवांवर होणार नाही, अशी माहिती विविध पंचांगामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाची धामधूम सुरू आहे.

११ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी १३ ला रात्री मोठी होळी होईल तर काही ठिकाणी भद्रेचे होम हे १४ ला सकाळी सूर्योदयाचे वेळी लावले जातील.

ला दिनदर्शिकेत खग्रास चंद्रग्रहणाची नोंद असल्याने विविध शंकाकुशंकांना सुरु‌वात झाली. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हो खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे कोणताही रोग पडत नाही. ग्रहणकाळात खाल्ल्याने कोणी मरत नाही. हे महाराष्ट्रातील पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी अनेकवेळा सिद्ध करून दाखवले, तरीही ग्रहण हा शब्दच निषिद्ध असल्याने चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्यावेळी आजही घरातून बाहेर पडू नका, ग्रहणकाळात काही खाऊ नका, असे सांगितले जाते. मग शिमगोत्सवासारखा सण ग्रहणकाळात कसा साजरा करायचा. त्या वेळी होम लावून चालतील का? देवाचे कार्य ग्रहणकाळात कसे करणार?

अशा अनेक शंकाकुशंका चर्चिल्या जात आहेत. वास्तविक हे ग्रहण भारतात दिसणारच नाही, याबाबत पंचांगामध्ये स्पष्टपणे लिखाण आहे. त्यामुळे ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत, असे दाते पंचांगाने स्पष्ट लिहिले आहे. निर्णयसागर पंचांगानुसार, खग्रास चंदग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक धार्मिक नियम येथे पाळण्याची जरूरी नाही, असे म्हटले आहे तर कालनिर्णयच्या दिनदर्शिकेतही चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे ज्योतिषी योगिनी जोशी यांनी सांगितले आहे

रक्तचंद्र पाहण्याची संधी
खग्रास चंद्रग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येईल. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. अशा स्थितीत दररोज स्वच्छ, पांढरा दिसणारा चंद्र ग्रहणकाळात लालसर होईल. याला रक्तचंद्र असेही म्हणतात. हे चंद्राचे सौंदर्य वाढवणारी खगोल शास्त्रीय घटना अमेरिका, पूर्व आशिया येथून पाहता येईल. भारतात चंद्रग्रहण दिसणार नसल्याने रक्तचंद्र आपल्याला पाहायला मिळणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 12/Mar/2025