भारतीय ज्ञान परंपरा एक जीवनपद्धती : डॉ. विनायक रजत भट

रत्नागिरी : भारतीय ज्ञान परंपरा केवळ संस्कृत भाषेशी निगडीत नसून ती सर्वसमावेशक आहे कारण भारतीय ज्ञान परंपरा ही एक जीवनपद्धती आहे असे गौरवोद्गार चाणक्य विश्वविद्यालयाचे भारतीय ज्ञान परंपरा विभागातील प्रा डॉ.विनायक रजत भट यांनी काढले.

ते त्रि दिवसीय भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्या निधी सहाय्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा (स्वायत्त) संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व चाणक्य विश्वविद्यापीठ, बंगळुरू यांच्या भारतीय ज्ञान परंपरा केंद्राच्या ज्ञान सहयोगाने रत्नागिरी शहरातील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात करण्यात आले होते. या वेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) संस्कृत विभाग प्रमुख डॉ कल्पना आठल्ये आदी मंचावर उपस्थित होते.

या वेळी मनोगतात डॉ. विनायक रजत भट म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून सगळ्यांना भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय? आणि तिचे आताच्या काळात असलेले महत्त्व नेमके काय? या प्रश्नांची उकल झाली असेल.एखादे पुस्तक कोणकोणत्या अंगाने वाचावे व ते वाचत असताना त्याचे सूक्ष्म वाचन कसे करावे हे आपण आत्मसात केले आहेच. त्यामुळे ही सवय कायम ठेवा. जेणेकरून भारतीय ज्ञान परंपरेत अनेक नवनवीन विषय जोडण्यात तुम्ही भरीव मदत करू शकाल.

या वेळी प्रास्ताविकात रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी संस्कृत व विविध भारतीय भाषा यातील असलेले ज्ञान व त्यातील चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे म्हटले. अध्यक्षीय भाषणात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ कल्पना आठल्ये यांनी आम्ही नक्कीच भारतीय ज्ञान परंपरेत आमच्यापरीने योगदान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असा विश्वास दर्शवला.

सकाळच्या सत्रात सर्व सहभागींनी आपापल्या विषयावर सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी प्राध्यापक, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण ४५ जणांचा सहभाग होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 12-03-2025