गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे सध्या तापमान वाढीचा फटका पर्यटनावर आधारित व्यवसायांना बसू लागला आहे. उन्हामुळे पर्यटकांची संख्या घटली असून, दुपारच्या सुमारास समुद्रकिनारी शुकशुकाट पसरत आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होत आहे. उन्हाच्या प्रचंड झळा सोसाव्या लागत असल्याने पर्यटकांकडून पर्यटनासाठी फिरताना आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. गणपतीपुळेत सकाळच्या सुमारास येणाऱ्या पर्यटकांकडून केवळ देवदर्शन आणि पर्यटनांचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाचा मार्ग धरला जात आहे.
भर दुपारी गणपतीपुळे मंदिर परिसर व समुद्र चौपाटी परिसरात पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा ही सुरू असल्याने पर्यटकांची संख्या रोडावल्याचे मत व्यक्त होत आहे. तापमान वाढत असल्याने पर्यटकांकडून ठिकठिकाणी सावलीचा आधार घेतला जात आहे. थंडाव्यासाठी शीतपेयांची मागणी वाढली असून, कलिंगड, सरबत विक्रेते व थंडपेये दुकानांच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 13/Mar/2025














