कुंभार्ली घाटातील वळणावर कंटेनरमध्ये बिघाड; वाहतूक ४ तास ठप्प

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटातील एका मोठ्या वळणार माल वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा एक्सेल तुटल्यामुळे मंगळवारी रात्री १२ च्या दरम्यान घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल चार तासांनंतर पोलिसांच्या मदतीने हा मार्ग मोकळा करण्यात आला.

अलोरे शिरगाव पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ घाटात धाव घेऊन एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रात्री चार वाजता सदरच्या गाडीचे काम पूर्ण झाल्यावर घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली. जवळपास चार तासांनंतर कुंभार्ली घाटातील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली. मात्र अलोरे पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली.

गेल्या काही महिन्यांपासून कुंभार्ली घाटात सातत्याने दुर्घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कुंभार्ली घाटाच्या माथ्यावर असलेल्या एका अवघड वळणावर कार सुमारे अडीचशे फूट खोल दरीत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याशिवाय अधूनमधून या घाटात अपघात घडत आहेत. तसेच कुंभार्ली घाटातील सोनपात्र येथील वळणावर वाहने अडकून पडत असल्याच्याही घटनाही नेहमी घडत आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने व राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे ढासळले असून, रस्ताही जागोजागी धोकादायक बनला आहे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 13/Mar/2025