रत्नागिरी : महाबँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

रत्नागिरी : बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधी व मनमानी धोरणांविरोधात पुकारलेले कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन काल बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिस-रत्नागिरीसमोर यशस्वी झाले. या आंदोलनातील पुढील टप्प्यात २० मार्चला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचाऱ्यांचा एकदिवसाचा देशव्यापी संप घोषित करण्यात येईल, असा इशारा बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

नोकरभरती, द्विपक्ष बोलणी पुनर्स्थापित करा, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, मान्यताप्राप्त संघटनेबरोबरील कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, व्यवसायवृद्धीसाठी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग बोलवा या व इतर मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी गेले महिनाभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात प्रथम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सर्व शाखांमधून कर्मचाऱ्यांच्या सह्यांची निवेदने पाठवण्यात आली. रत्नागिरीतील झोनल ऑफिससमोर महाबँकेतील कर्मचारी काल सकाळपासूनच धरणे आंदोलनाला बसले होते.

बँकेचे नकारात्मक धोरण
बँकेचे नकारात्मक धोरण अशाच पद्धतीने चालू राहिले, तर एप्रिल महिन्यामध्य हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा बैंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर संघटनेमार्फत देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होत. आंदोलनाचे नेतृत्व उपाध्यक्ष राजेंद्र गडवी व भाग्येश खरे या संघटनेच्या प्रतिनिधींनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 13/Mar/2025