कृषी खात्यात नऊ हजार पद रिक्त

नागपूर : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बाबत कोणीच गंभीर नसल्याने ही पदे केव्हा भरली जातील या बाबत देखील अनिश्चितता आहे. या संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध आस्थापनांवर राज्यभरात २७ हजार ५०२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यःस्थितीत केवळ १८ हजार ३६९ कर्मचारीच कार्यरत आहेत. तर ९ हजार १३३ पदांवर नियुक्त्याच झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे कृषी विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा दररोज प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संबंध येतो, अशाच ‘गट-क मधील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. त्यांची संख्या तब्बल ५ हजार ५६५ इतकी प्रचंड आहे. त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक (७३), कृषी सहायक (१,६९३), अधीक्षक (५८) यांच्यासोबतच लिपिक, टंकलेखक, अनुरेखक, वाहनचालकांचा समावेश आहे. तर गट-ड’मधील नाईक, शिपाई (१,९८९), क्लीनर, माळी (५६९ प्रशिक्षित मजूर (२९९), मदतनीस, परिचरांचीही वाणवा आहे. गंभीर बाब म्हणजे, डिसेंबर २०२४ पर्यंत राज्याचे कृषी आयुक्त पदही रिक्तच होते. जानेवारीत सूरज मांढरे यांना आयुक्त पद देण्यात आले.

मात्र आयुक्तांसोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची क्षमता असलेली संचालक, सहसंचालक ही महत्त्वाची पाच पदे अद्यापही रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी, कृषी अभियंता ही पदे भरलेली नसल्याने कृषी क्षेत्राशी संबंधित कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ वादग्रस्त गेला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विभागनिहाय बैठका घेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला आहे. तरीही विभागातील रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आली आहे.

सरकार, ही रिक्त पदे कधी भरणार ?
संचालक १, कृषी सहसंचालक ४, अधीक्षक कृषी अधिकारी ९, प्रशासकीय अधिकारी ३, लेखा अधिकारी ११, स्वीय सहायक ६, कृषी अधिकारी ३९८, कृषी कनिष्ठ अभियंता ८, कृषी पर्यवेक्षक ७३, कृषी सहायक १६९३, अधीक्षक १६, सहायक अधीक्षक ४२, वरिष्ठ लिपिक १३१, लिपिक/टंकलेखक १०९१, आरेखक ३४, अनुरेखक १९००, सहायक ग्रंथपाल १, लघुलेखक (उच्चश्रेणी) ८, लघुलेखक (निम्नश्रेणी) ५२, लघुटंकलेखक ५२, वाहनचालक ४७१, मशीनमन १, टिलर ऑपरेटर १५, नाईक दप्तरी ७२, शिपाई/रखवालदार १९८९, क्लीनर १३, माळी/रोपमळा मदतनीस ५५९, प्रशिक्षित मजूर २९९, प्रयोगशाळा सहायक/परिचर २१.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 14/Mar/2025