Ratnagiri : दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र अभियान’

रत्नागिरी : इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी शाळांना ३० जूनपर्यंत करावी लागणार आहे. भाषा आणि गणित विषयासाठीच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

या अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. या अभियानांतर्गत दुसरी ते पाचवीच्या १०० टक्के विद्याथ्यर्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयंअर्थ सहाय्यित आणि विनाअनुदानित व्यतिरिक्त शाळा, सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू केला आहे.

नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय अभियानात ठेवले आहे. विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करणार आहे.

शिक्षक करणार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता प्राप्त केल्यावरच विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून संकेतस्थळावर कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे लागणार आहे. शिक्षकांनी कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला त्वरित भेट देऊन मूल्यांकन करावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 17/Mar/2025