रत्नागिरी : 138 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची महसूलला चिंता

रत्नागिरी : जिल्हा महसूल विभागाला मिळालेले १३७ कोटी ९५ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची चिंता सतावत आहे.

मार्च अखेर आल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घाई आता प्रशासनाला लागली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या उत्खननाबाबत ठेकेदार कंपनींना रॉयल्टी भरण्यासाठी सूचना केली आहे. त्याच अनुषंगाने क्रशर मशिन चालकांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना सुमारे ३० हजार ब्रासची रॉयल्टी (स्वामित्व धन) भरण्याच्या सूचना केल्या आहेत. फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण उद्दिष्टापैकी सुमारे ३७ टक्केच वसुली झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्याच्या महसूल विभागाला यावेळी महसुली उद्दिष्ट पूर्ण करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जमिन महसूल, गौण खनिज, करमणूक कर, महसुली वसुली प्रमाणपत्र, नगर पालिका प्रशासन, रोजगार हमी योजना, शिक्षण कर, एनए, दस्त आदींच्या माध्यमातून महसूल विभागाला महसूल मिळतो. शासनाकडून आलेले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी जोरात कामाला लागले आहेत. त्या विभागाकडून कर येणे बाकी आहे, त्या विभागाच्या बैठका घेऊन त्यांना कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा खनीकर्म विभागाकडूनच सर्वांत जास्त सुमारे ९५ कोटींच्या दरम्यान महसूल मिळतो. वाळू लिलावातील अनियमितता आणि नवे वाळू धोरण यामुळे महसुलावर चांगलाच परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लवकरात लवकर महसूल गोळा व्हावा यासाठी अधिकारी वर्ग प्रयत्नशील आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 17-03-2025