ऐन शिमगोत्सवात संगमेश्वरवासीयांची पाण्यासाठी वणवण

संगमेश्वर : संगमेश्वर शहराला लोवले येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो, मात्र गेले दोन दिवस काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही भागांत दोन दिवस नळाला एक थेंबसुद्धा पाणी आले नसल्याने शिमगोत्सवात संगमेश्वरवासीयांचे अतोनात हाल झाले.

कोकणात शिमगोत्सव सुरू आहे. संगमेश्वर शहराला लोवले येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा होतो, मात्र गेले दोन दिवस अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. काही भागांत पाण्याचा थेंबही आलेला नाही. याबाबत पंप नादुरुस्त असल्याचे कारण ग्रामपंचायत प्रशासन पुढे करून याबाबत नेहमीप्रमाणे उत्तरे देऊन आपली बाज सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कुठलीही प्रशासन व्यवस्था ही नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजेपासून वंचित ठेवू शकत नाही; पण गेले दोन दिवस संपूर्ण शहराला पाणी आलेले नाही. शिमगोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पाहुणे आले असताना पाण्याचा पत्ता नसल्याने खूप हाल झाले.

याच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील लोकांचेही पाण्याविना अतोनात हाल झाले. या वस्तीतही दोन दिवस पाणी आलेले नाही. येथील वस्तीला पाण्याचे अन्य कोणतेही स्रोत नसल्याने ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. याचा विचार संबधित प्रशासनाने करून तातडीने उपाययोजना कराव्यात, सणासुदीला तरी किमान पुरेसे पाणी शहरवासीयांना मिळावे असे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दोन दिवस पाणी नसल्या संदर्भात पंप नादुरुस्त असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले, मात्र तीन पंप ग्रामपंचायत मालकीचे असून एक जॅकवेलला कार्यान्वित असून, पर्यायी अतिरिक्त दोन पंप शिल्लक असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळणारी उत्तरे संतापजनक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 18/Mar/2025