मंडणगड : कासवांचे गाव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या वेळास येथे कासवालयाच्या निर्मितीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे वेळासला वेगळी ओळख मिळणार असून, या निमित्ताने गावात आणखी पर्यटक येऊन गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.
वेळास येथील समुद्रकिनारी आढळून येणारे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाचा जन्मोत्सव पाहण्यासाठी देश, राज्यभरातील अनेक पर्यटक या गावास दरवर्षी भेट देतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात पसरलेल्या या गावात सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू झाली. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो कासवांना जीवनाचा नवीन मार्ग मिळाला आहे.
कासवांचे गाव ही नवीन ओळख आणखी पुढे नेण्यासाठी येथे जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव हेमंत सालदुरकर यांनी रत्नागिरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक चर्चा करून वेळास येथील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी मंडणगडचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड. राकेश साळुंखे, राजेंद्र पड्याळ, केतन दरिपकर, निशांत भाटकर, भालचंद्र नागवेकर, सुनील खाडे, सालेम सय्यद आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 24/Mar/2025














