पाण्याचा सांभाळून वापर करणे काळाची गरज : सुहेल मुकादम

रत्नागिरी : स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी जलदिन साजरा केला जातो. पाणी केवळ मानवासाठीच नाही तर पक्षी, प्राणी, वनस्पती आदींसाठीही आवश्यक आहे. त्यामुळे पाणी सांभाळून वापरणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी केले.

पाण्याचे महत्त्व आणि संवर्धनासाठी शहरात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेच्या उ‌द्घाटनप्रसंगी मिस्त्री हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सुहेल मुकादम यांनी पाण्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी, सर्व सजीवांसाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत शहरातील विविध भागांत तेथील सोसायटीमध्ये जनजागृतीची मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नाम फाउंडेशनचे सदस्य शाहनवाज शहा यांनी पाणी जतन करणे काळाची गरज असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, असे आवाहन केले. तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी धरण, नद्या मधील गाळ उपसला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या क्रार्यक्रमास भागातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सजीव घटकांना पाणी अत्यावश्यक
पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक सजीव घटकासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे हे गरजेचे आहे. त्याअनुषंगानेच ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे मान्यवरांनी सांगितले. प्रत्येक घटकाने पाण्याचा योग्य आणि सांभाळूनच वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 25/Mar/2025