रत्नागिरी : खेडशी सहकारी संस्थेत १६ लाखांहून अधिक रकमेचा अपहार; सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : खेडशी विविध कार्यकारी सहकारी संस्था, खेडशी (ता. जि. रत्नागिरी) येथे सुमारे १६ लाख ४५ हजार ३७६ रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव संदीप दत्ताराम घवाळी यांच्याविरुद्ध रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार दि. १ एप्रिल २०२० ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत झाला असून, याबाबतची फिर्याद दि. २५ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२० वाजता नोंदवण्यात आली.

फिर्यादी माधव भास्कर हिर्लेकर (वय ६४ वर्षे), हे प्रमाणित लेखापरीक्षक असून ते रत्नागिरीतील मिरजोळे येथील पाडावे वाडी, आदर्शनगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ एप्रिल २०२० ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत ते खेडशी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात संस्थेचे सचिव असलेल्या संदीप दत्ताराम घवाळी (रा. डफळचोळ वाडी, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) याने संस्थेकडे जमा झालेली रक्कम बँक खात्यात जमा न करता खोट्या नोंदी करून त्या रकमेचा अपहार केला. या गैरव्यवहारामुळे संस्थेच्या सभासदांची फसवणूक झाली असून सार्वजनिक रकमेचा दुरुपयोग झाल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी भारतीय दंड विधान अधिनियम १८६० च्या कलम ४०६ (विश्वासभंग), ४०८ (विश्वासभंग करून अपहार) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा क्रमांक ५६/२०२५ असा या प्रकरणाला देण्यात आला आहे. अपहृत रक्कम ही १६,४५,३७६ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप घवाळी याने संस्थेच्या रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची आणि बँक खात्यांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. याशिवाय, संस्थेच्या इतर कागदपत्रांचीही छाननी केली जाणार आहे.

सहकारी संस्थांमधील अशा गैरप्रकारांमुळे सभासदांचा विश्वास डळमळीत होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 26-03-2025