खेड : खेड तालुक्यातील साळीवाडा येथे रविवारी सायंकाळी ५:०० ते ६:०० वाजण्याच्या दरम्यान एका ४० वर्षीय व्यक्तीने घराच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस.एस.) १९४ अंतर्गत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने तातडीने दोरी कापून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, मयत अमोल अनंत तांबडे (वय ४० वर्षे, रा. साळीवाडा खेड, ता. खेड) याने आपल्या घराच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना त्याच्या पत्नीच्या नजरेस पडताच तिने तात्काळ चाकूने दोरी कापली. यामुळे अमोल खाली जमिनीवर पडला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी (ता. खेड) येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना रविवारी सायंकाळी ५:०० ते ६:०० वाजण्याच्या दरम्यान घडली असून, रात्री ११:५२ वाजता खेड पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ३३/२०२५ नोंदवण्यात आला.
खेड पोलिसांनी या प्रकरणाची नोंद भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस.एस.) १९४ अंतर्गत केली आहे, जे अनैसर्गिक मृत्यूच्या तपासाशी संबंधित आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी मयताच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 31-03-2025














