चिपळूण : चिपळूण शहरात गेल्या तीन वर्षांपासून बनावट कामे होत आहेत. १२ कोटी रुपयांची कामे बनावट झाली असून या कामांची चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून शहरात अनेक विकासकामे झाली असून, काही कामे आजही सुरू आहेत; मात्र झालेल्या व सुरू असलेल्या कामांचा दर्जा पाहता ती निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी नागरिक आमच्याकडे करत आहेत. त्यामुळे आपण या कामांची चौकशी करावी व तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत.
२०२२ पासून नगर पालिकेत प्रशासकीय कारभार आहे. या काळातही झालेली कामे व सध्या सुरू असलेली कामे बनावट आहेत. त्यामुळे २०२२ पासून आजपर्यंत झालेल्या कामांची यादी व त्यापुढे त्या कामाची रक्कम दर्शवणारी माहिती मला मिळावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
२०२२ पूर्वी नगर पालिकेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक कार्यरत असताना आम्ही शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात गॅसिफायर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर सभागृह बरखास्त झाले व कचरा प्रकल्पातील कामे प्रशासकीय कारभारात सुरू झाली; मात्र गॅसिफायर व अन्य कामे बोगस व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे आपण कचरा प्रकल्पात झालेल्या कामांची चौकशी लावावी व जोपर्यंत त्याच्या दर्जाबाबत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ठेकेदारांची बिले अदा करू नयेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 31/Mar/2025














