चिपळूण : लोककला महोत्सवात दहा नमनांचे सादरीकरण

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित नमन लोककला महोत्सवाची शेकडो नमन प्रेमींच्या उपस्थितीत सांगता झाली. तीन दिवस रंगलेल्या या नमन लोककला महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील दहा दर्जेदार नमन पाहाण्याची रसिकांना संधी मिळाली.

संगमेश्वर तालुक्यातील शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाचे सादरीकरण शेवटच्या दिवशी झाले. पुरुष कलाकारांनी साकारलेल्या स्त्री भूमिकांतील दिलखेचक नृत्य व अभिनयाच्या जोरावर टाळ्या मिळवत शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाने रसिकांची वाहवा मिळवली. पहिल्या दिवशी संगमेश्वर तालुक्यातील कोंडे देवळाची वाडी येथील बालमित्र नमन मंडळाचे सादरीकरण झाले.

यानंतर गुहागर तालुक्यातील वाडदई वरचीवाडी येथील श्री कालभैरव नमन नाट्य मंडळाचे सादरीकरण झाले. पहिल्या दिवशी पारंपारिक आणि आधुनिकतेचा बाज पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी लांजा तालुक्यातील रुण येथील श्रीमठ बाबा नमन मंडळ, राजापूर तालुक्यातील भू पंचक्रोशी येथील हौशी कलावंत नाट्य नमन मंडळ, देवरुख येथील श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच, रत्नागिरीतील फणसवळे येथील श्री हनुमान भक्त सेवा मंडळ यांचे सादरीकरण झाले.

सह्याद्री मार्लेश्वर कला मंचाने आधुनिकतेचे दर्शन घडवले. यामध्ये महिला कलाकारांनी भूमिका केल्या, परंतु भू पंचक्रोशीतील हौशी कलावंत नाट्य नमन मंडळाने आपला पारंपरिक बाज जपून ठेवल्याचे दिसून आले. श्री हनुमान भक्त सेवा मंडळाच्या सादरीकरणालाही रसिकांची चांगली दाद मिळाली. अखेरच्या दिवशी गुरुवारी कामथे हुमणेवाडीतील श्रीराम नाट्य नमन मंडळाने गण सादर केला. आसगे मांडवकरवाडी येथील

नवयुग सेवा नमन मंडळाने उत्तम सादरीकरण केले. शाहीर देवेंद्र झिमन यांच्या आवाजाने नटलेलं आणि अपंग कलाकार चंद्रकांत पालकर यांनी स्वतःच्या खांद्यावर पेललेले कुवे तालुक्यातील लांजा येथील कुवे श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळाने सादरीकरणाने रसिकांची मनी जिंकली, तर शेवटी शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाने प्रबोधन करीत आपले सादरीकरण केले.

गायक एकनाथ डिके, कल्पेश जाधव, मावशी निलेश किंजळकर या कलाकारांसह सर्वांनीच रसिकांची मने जिंकली. शेवटच्या दिवशी मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी आमदार सदानंद चव्हाण सपत्नीक हजर होते. नमन लोककला संघटनेचे पी. टी. कांबळे, संदीप जोशी, रवींद्र मठकर, मंगेश पेढांबकर, रामदास राणे, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, निहार गुडेकर, समीर जानवलकर, आशिष खातू आदींनी या महोत्सवाला हजेरी लावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 31/Mar/2025