राजापूर : आपले आई-वडील म्हणजेच आपले खरे देव असून त्यांच्या प्रति सदैव ऋणी राहिले पाहिजे. आपल्या आईने आपल्या डोक्यावरून फिरवलेला आशीर्वादाचा हात हा जगातील कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असून माय, बापांचा विसर आपणास कधीही पडता कामा नये, असे प्रतिपादन कवी आणि व्याख्याते अनंत राऊत यानी येथे केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी अनंत राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या आणि तितक्याच प्रभावी काव्य सादरीकरणामधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी व्यासपीठावरती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, महाविद्यालय विकास समिती सदस्य अॅड. राहुल राणे, समन्वयक डॉ. अतुल भावे, डॉ. घनश्याम हराळे, डॉ. हेमंत अकोलकर, प्राचार्य होनमाने, सुर्वे मॅडम, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विजय देवकर आदी उपस्थित होते.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय मेस्त्री यांनी करून दिला तर आभार प्रा. डॉ. गौरव पवार यांनी मानले. सूत्रसंचालक म्हणून प्रा. शैलेंद्र प्रभूदेसाई यांनी कार्यक्रमामध्ये बहार आणली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवक यांनी परिश्रम घेतले. या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 01/Apr/2025














