चिपळूण : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चिपळूण नगर परिषदेसाठी मिनी रेस्क्यू फायर वाहन उपलब्ध झाले असून, राज्यातील व नगरपालिकांना देण्यात आलेल्या या छोट्या अग्निशमन यंत्रणा वाहनाचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील ‘ब’ वर्ग नगरपालिकेसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रेस्क्यू फायर वाहनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी व चिपळूण न.प.ला ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत दुर्घटना घडल्यानंतर संबंधित ठिकाणी वेळेत पोहोचावे यासाठी हे वाहन फायदेशीर ठरणार आहे. शहराचा विकास वाढत असताना जुन्या नागरी वस्तीमधील अरूंद रस्त्यामधून जाण्यासाठी व अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास मोठ्या वाहनांना अशा ठिकाणी जाण्यास अडथळे निर्माण होतात.
ही बाब लक्षात घेता दुर्घटनेत सापडलेल्यांची सुटका करण्याकरिता अत्याधुनिक उपकरणे असलेली व अरूंद रस्त्यातून सहज घटनास्थळी जाणारे मिनी फायर रेस्क्यू अग्निशमन यंत्रणा वाहन चिपळूण न.प.ला देण्यात आले आहे. यावेळी न.प. च्या माध्यमातून मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी यंत्रणेची विधिवत पूजा करून लोकार्पण केले.
यावेळी उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक़ श्री. खाडे, आनंद बामणे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, नगर अभियंता दीपक निंबाळकर, मिळकत विभागप्रमुख सागर शेडगे, सुदीप जाधव, आस्थापना विभागप्रमुख राजेंद्र जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, फायरमन अमोल वीर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 02/Apr/2025














