चिपळूण : चिपळूण शहरात बॉम्बे सर्कस दाखल झाली आहे. रमजान ईद आणि विद्यार्थ्यांचा सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन शहरातील बहादूरशेख चौकाजवळ स्वा. सावरकर मैदानात ही सर्कस सुरू झाली आहे. ईदनंतर या सर्कसला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिपळुणात भव्य अशी बॉम्बे सर्कस दाखल झाली आहे. अलीकडच्या काळात विशेषतः प्राण्यांना सर्कसमध्ये बंदी केल्यानंतर सर्कसला घरघर लागली आहे. त्यातही बॉम्बे सर्कसने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. भारतामध्ये सहा मोठ्या अधिकृत सर्कस आहेत तर अन्य अनधिकृत आणि मिनी सर्कस ठिकठिकाणी शो करीत असतात. मात्र, या सहा सर्कसमध्ये बॉम्बे सर्कस ही अग्रगण्य आहे.
मोठा तंबू या मैदानावर उभारण्यात आला असून, तब्बल एक महिना या सर्कसचा मुक्काम आहे. आफ्रिकन, चिनी, ऑस्ट्रेलियन कलाकारांचा भरगच्च शो दाखविला जाणार आहे. विशेषकरून चित्रथरारक शो वर भर देण्यात आला आहे.
आफिक्रन कलाकारांचे शो या सर्कसमध्ये पाहायला मिळणार आहेत. जिम्नॅस्टिक, डॉग शो, मृत्यू गोल, झुला, बाईक उडविणे असे अनेक थरारक कलाप्रकार सादर होणार आहेत. विशेष म्हणजे तीन विदुषकांची धम्माल बच्चेकंपनीला हसविणार आहे.
लवकरच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांच्या मनोरंजनासाठी ही सर्कस दाखल झाली आहे. विशेष करून सर्कस म्हणजे काय? ती कशी असते? त्यामध्ये काय दाखविले जाते हे शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी पालक देखील बॉम्बे सर्कस पाहायला जात आहेत. मुलांना या सर्कसबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 02/Apr/2025














