राजापूर : बंदरधक्का येथे नंदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

राजापूर : शहरातील बंदरधक्का येथे गेली अनेक वर्षे भग्नावस्थेत असलेल्या नंदीच्या जागी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी नवीन नंदीची प्राणप्रतिष्ठापणा केली.

राजापूर शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून, या ठिकाणी अनेक पुरातन वास्तू असल्याचे दिसून येते. इंग्रज काळात राजापूरच्या बंदर धक्क्यावरून थेट परदेशात व्यापार होत होता. त्या धक्क्यावर गेली अनेक वर्षे एक नंदी जीर्ण झालेल्या अवस्थेत होता.

काही वर्षांपूर्वी राजापूर नगर पालिकेने या धक्क्याचे सुशोभीकरण केले होते; मात्र हा जीर्णावस्थेतील नंदी तसाच होता. दोन वर्षांपूर्वी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या नंदीच्या जागी नूतन नंदी बसविण्याचे ठरवत त्यासाठी निधी जमा केला होता; मात्र त्यानंतर राजापुरातील शिवप्रेमी नागरिकांनी या ज्येष्ठ नागरिकांच्या स्वप्नाला बळ देत यावर्षी नव्याने दुसरा नंदी तयार करून त्याची प्राणप्रतिष्ठापणा नुकतीच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केली. हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेवेळी या नूतन नंदीची यथासांग पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.

यावेळी राजापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र कुशे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, राजेंद्र नवाळे, सुशांत मराठे, मंदार बावधनकर, अभिजित नार्वेकर, डॉ. शुभम कुशे व अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 02/Apr/2025