राजापूर : तेरवणमध्ये श्रीराम महोत्सव सुरू

राजापूर : विश्व हिंदू परिषदेच्यावतीने तेरवण थोरलीवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या २०व्या श्रीराम महोत्सवाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. यावेळी हिंदू नववर्षाचे स्वागत करतानाच श्रीराम मूर्तीची ढोलताशांच्या गजरात नाचत, तसेच श्रीरामांचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.

हिंदू नववर्ष शोभायात्रा व श्रीराम मूर्ती आगमन भव्य मिरवणूक श्रीरामतीर्थ, सिद्धेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर, गणपती मंदिर, ग्रामदेवता जुगादेवी मंदिर, ब्राह्मण देवमार्गे तेरवण बाईंगवाडी समाजमंदिर, पूर्ण थोरलीवाडी, गांगोदेव दर्शन करून तेरवण थोरलीवाडी येथील समाज मंदिरात आली. याठिकाणी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना विश्व हिंदू परिषदेचे प्रतिष्ठित कार्यकर्ते केशव तेरवणकर यांच्या हस्ते तर पुरोहित बापू पाध्ये यांच्या उपस्थितीत झाली. सायंकाळी ७ वा. महाआरती, रात्री ९.३० वा. तेरवण थोरलीवाडी येथील शिमगा खेळ्यांचा कार्यक्रम करण्यात आला.

या श्रीराम नवरात्र उत्सवाच्या शोभा बनलेल्या श्रीराम मूर्तीची आकर्षक मखर सजावट तेरवण थोरलीवाडी युवक मंडळ यांनी केली आहे. गुढीपाडवा ते श्रीराम नवमी असे नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी विधिवत श्रीराम मूर्तिपूजा, सकाळी ७ ते रात्री १० भाविकांसाठी दर्शन, दररोज संध्याकाळी ७ वाजता महाआरती, दररोज रात्री कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले आहे.

श्रीराम नवमीला सकाळी ७ वाजता श्रीराम मूर्तीची पूजा, १० वाजता श्रीराम जन्मोत्सवावर कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म, श्रीराम पाळणागीत, श्रीराम सामूहिक जप, १ वाजल्यापासून श्रीराम मूर्ती दर्शन, दुपारी २ वाजता हळदी-कुंकू, १ ते ४ महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता आरती, रात्री ९ वा. जुगादेवी प्रासादिक नमन मंडळ तेरवण थोरलीवाडी यांचा नमनाचा कार्यक्रम, रावणाबरोबर श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांचे घनघोर युद्ध, रात्री ठीक १२ वाजता रावणाच्या प्रतिमेचे दहन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा श्रीरामोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद तेरवण गाव समिती व तेरवण गावातील सर्व वाडी ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 02/Apr/2025