दापोली : मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून राज्यात १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ही मोहीम राबवण्यासाठी दापोली उपविभागातील दापोली व मंडणगड तालुक्यामध्ये कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये ग्राममहसूल अधिकारी गावामध्ये मयत खातेदारांची यादी तयार करणार आहेत, वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर स्थानिक चौकशी करून मंडळाधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत. त्यानंतर ग्राममहसूल अधिकारी ई -फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार केल्यावरून मंडळाधिकारी विहित कार्यपद्धतीनुसार सातबारा उतारा दुरुस्त करणार आहेत.
एकत्र कुटुंब कर्ता शेरा कमी करून सर्व वारसांची नावे सातबाऱ्याच्या भोगवटादार सदरी लावण्यासाठीची मोहीमही याच दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. ग्राममहसूल अधिकारी स्वतःहून एकत्र कुटुंब कर्ता ही मूळ नोंद अभिलेखातून प्राप्त करून सर्व वारसांची नावे नवीन नोंद घेऊन अधिकार अभिलेखात दाखल करणार आहेत. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचा स्वतःच्या जमिनीवर कायदेशीर मालकी हक्क स्पष्ट होणार आहे.
जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदीकरिता अर्ज ई-हक्क प्रणालीमार्फतच नोंदवण्यात येणार आहेत. त्यासाठी खातेदार यांनी वारस नोंदीकरिता https://pdeigr.maharashtra.gov.i n/frmLogin या संकेतस्थळावर आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत.
१० मेपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. याबाबत ग्राममहसूल अधिकारी, मंडळाधिकारी तसेच संबंधित तहसीलदार यांच्याकडे संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकरी/खातेदार यांनी या मोहिमेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 03/Apr/2025














