भाजप सदस्य नोंदणीला रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिसाद : राजेश सावंत

चिपळूण : भाजपने राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यातही भाजपने चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी मोहीम राबविली होती. त्यानुसार रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३० हजार, चिपळूणमध्ये १७ हजार, तर राजापूरमध्ये १६ हजार सदस्य नोंदणी झाली आहे. भाजपच्या सदस्य नोंदणीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.

चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी शहरातील शिक्षकभवन येथे झाली. या बैठकीपूर्वी भाजपच्या वर्धापनदिननिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर चर्चा झाली. सावंत म्हणाले, जिल्ह्यात रविवारी (ता. ६) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही हे उपक्रम राबविले जाणार आहेत. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरघरांत ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करणार आहेत. या दिवशी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे.

रामनवमीनिमित्त विविध मंदिरांत लाडूचे वाटपही करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा सचिव अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदासस् राणे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शहराध्यक्ष राम शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकते उपस्थित होते.

खासदार राणेंच्या वाढदिनी कार्यक्रम
कोकणचे नेते व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ एप्रिलला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवरूख येथील मराठा भवनमध्ये राणे शुभेच्छा स्वीकारणार आहेत. याच दिवशी संगमेश्वरात बैलगाडा स्पर्धेचेही आयोजन केले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:50 PM 05/Apr/2025