चिपळूण : नदी काठावरील गाळाची विल्हेवाट लावण्याची शिरळ ग्रामपंचायतीची मागणी

चिपळूण : पाटबंधारे विभागाकडून कोंढे, शिरळ येथील नदीमध्ये काही दिवसांपासून गाळ उपसा सुरू आहे. उपसलेला गाळ शेतकऱ्यांना न देता नदीच्या काठावर टाकला जात आहे. पावसाळ्यात पुन्हा हा गांळ नदीत जाणार आहे. या गाळाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करणारे निवेदन काल शिरळ ग्रामपंचायतीच्या वतीने महसूल आणि पाटबंधारे विभागाला देण्यात आले.

कोंढे, शिरळी नदी हो वाशिष्ठी नदीला येऊन मिळते. गेल्या काही दिवसापासून ही नदी गाळाने भरलेली असल्याने पावसाळ्यात स्थानिक पातळीवर पुराची मोठी समस्या निर्माण होते. परिणामी, गतवर्षापासून या नदीतील गाळ उपसा पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून केला जात आहे. यावर्षींही या नदीत शिरळ व कोंढे या दोन ठिकाणी पोकलेन लावून गाळ उपसा सुरू आहे: मात्र काढलेला गाळ सद्यःस्थितीत काठावर ठेवण्यात आला आहे.

नदीतून काठावर काढून ठेवलेला गाळ मिळणासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून तशी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत; मात्र आदेश झालेले नसल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे. या गाळाची विल्हेवाट न लावल्यास पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत जाईल. परिणामी, झालेला खर्च, घेतलेली मेहनत वाया जाणार आहे, त्यामुळे या संदर्भात शुक्रवारी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू काणे यांच्यासह शिरळ सरपंच शशिकांत राऊत, उपसरपंच फैय्याज शिरळकर यांच्यासह काही ग्रामस्थांनो तहसील, पाटबंधारे विभागात जाऊन निवेदन सादर केले. त्यामुळे प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 07/Apr/2025