रत्नागिरी : रामदेव बाबांचे परमशिष्य, पतंजलीच्या संस्थांचे केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ. परमार्थ देवजी पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये योग, आयुर्वेद आणि सनातन भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वामी रामदेव महाराज तसेच आचार्य बाळकृष्ण महाराज यांनी अहर्निश प्रयत्न केले.
स्वामीजींच्या प्रेरणेने स्थापन झालेली पतंजली योग समिती आणि पतंजली परिवारातील अन्य संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य जोमाने पुढे नेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वामीजींचे परमशिष्य डॉ. परमार्थ देव येत्या शुक्रवारपासून (दि. ११) पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत.
डॉ. देव आजीवन सेवाव्रती संन्यासी असून मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. ते उच्चविद्या विभूषित असून त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. उपनिषदांमध्ये योग विद्या या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. सध्या ते पतंजली विश्वविद्यालयात दर्शन विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. भारत स्वाभिमान ट्रस्टचे मुख्य केंद्रीय प्रभारी म्हणून १९ राज्यांमध्ये त्यांनी संघटनेच्या विस्ताराचे काम केले.
डॉ. देव १२ एप्रिल रोजी दापोली येथे नवभारत छात्रालयामध्ये पहाटे ५.३० ते ७ या वेळेत योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १३ एप्रिल ते मंगळवार १५ एप्रिल असे तीन दिवस रोज सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत लांजा येथे कार्यकर्त्यांना व योग साधकांना मार्गदर्शन करणार आहेत. १५ एप्रिलला सकाळी ११ ते १२.३० या वेळेमध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रामध्ये उपनिषदांमध्ये योगविद्या या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतंजली परिवारातील पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत, किसान सेवा समिती, महिला पतंजली योग समितीने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 09-04-2025














