चिपळूण : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत तालुक्यात नुकतीच सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ९ क्षयरोगी आढळून आले. गेल्या तीन महिन्यांत एकूण ९४ क्षयरोगी आढळून आले असून, ते शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांकडून उपचार घेत आहेत.
जोखीमग्रस्त गटामध्ये फुफ्फुसांचा क्षयरोग असणारे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असून, डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी संसर्गाची साखळी अखंडित राहण्यासाठी हे रुग्ण कारणीभूत ठरतात. त्यामुळे निदान व औषध उपचारापासून वंचित असणाऱ्या रुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेण्यासाठी १३ दिवसांची मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहर व ग्रामीण भागात चिरेखाणेतील कामगार, वसतीगृह, वृद्धाश्रम, बांधकामे करणारे कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार, मजूर, आदिवासी वाडी वस्ती, गावे वस्ती, ज्या गावात क्षयरुग्ण जास्त आहेत ती गावे, बेघर, रस्त्यावरील मुले, अनाथआश्रम, मागील दोन-तीन वर्षांपासून क्षय रुग्णांच्या संपर्कात व सहवासात असलेल्या व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेह असणारे रुग्ण अशा २८ हजार ६४६ नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यात ७३७ संशयित क्षयरोगी मिळाले. त्यांची थुकी तपासणी व एक्स-रे केले असता, ९ क्षयरुग्ण सापडले.
जानेवारीपासून १ मार्च महिन्यापर्यंत ९४ रुग्ण सापडले असून, त्यातील ३९ जण शासकीय, तर ५५ जण खासगी रुग्णालयाकडून औषधोपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 09/Apr/2025














