रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेने रत्नागिरी येथे फिजिओथेरपी पदवी महाविद्यालय सुरू करून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या संस्थेच्या “नी पेन फिजिओथेरपी मोफत कॅम्प” उपक्रमाला असि. चॅरिटी कमिशनर एन.एस. सय्यद यांनी शुभेच्छा देत या प्रयत्नांचे कौतुक केले. रत्नागिरी परिसरातील जनतेसाठी ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी उद्घाटनप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉ. रमेश चव्हाण, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व परकार हॉस्पिटलचे निर्माते डॉ. अलिमियाँ परकार, आर्थोटिस्ट डॉ. राजेंद्र कशेळकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाथरे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि फिजिओ डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग
संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत करताना रत्नागिरीच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या ५५ वर्षांपासून डॉ. रमेश चव्हाण आणि ४६ वर्षांपासून डॉ. अलिमियाँ परकार रत्नागिरीच्या आरोग्य सुधारणेसाठी कार्यरत आहेत. हे दोघेही या क्षेत्रातील पायोनिअर आहेत. तसेच, डॉ. राजेंद्र कशेळकर कृत्रिम अवयव रोपण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. या दिग्गजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि सेवा पार पाडावी.”
डॉ. अलिमियाँ परकार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले, “वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नेहमी सक्रिय राहावे आणि डॉक्टर म्हणून बाहेर पडल्यानंतर निस्वार्थ सेवा द्यावी.” तर डॉ. रमेश चव्हाण यांनी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या गुढगेदुखी मार्गदर्शन मोफत कॅम्पचे कौतुक करत याची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मोफत कॅम्पचा रुग्णांना लाभ
या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग घेतला, यापैकी काही रुग्ण व्हीलचेअरवरून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. करन कारा, डॉ. अनघा शेळके-शिंदे, डॉ. अनया शिंदे आणि डॉ. महिमा सावंत यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. यात ४६ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अनोखा ठरला, तर रुग्णांना तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनी या कॅम्पचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आणि दर दोन महिन्यांनी असा कॅम्प आयोजित करण्याची मागणीही केली.
फिजिओ डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “पुढील काळात एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालय ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ओपीडी सुरू करणार आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुष्का शिरसाठ यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 10/Apr/2025














