दापोली : कोळंबी दरात ८० टक्क्यांची घसरण; २६ टक्के भरावा लागणार कर

अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाचा हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला फटका

दापोली : अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला फटका बसला आहे. कोळंबीचे दर ८० टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी कोळंबी ही ७० रुपयांपर्यंत घसरली आहे तर अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे निर्यातीदरम्यान पूर्वीच्या ६ टक्क्यांऐवजी २६ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या धोरणामुळे मासळी व्यवसाय चांगलाच कोंडीत सापडला आहे.

कोळंबीमुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते तर भारतातील कोळंबीचे जगात सर्वात जास्त आयात करणारा देश हा अमेरिका आहे. त्यात काही विशिष्ट जातीच्या कोळंबीला मागणी जास्त असते. मात्र, अमेरिकेच्या ट्रम्प सरकारच्या टैरिफ धोरणामुळे कोळंबी व्यवसायास घरघर लागली आहे. त्यामुळे येथील अर्थकारण मंदावले आहे.

टॅरिफ वाढल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात अमेरिकी नागरिक कोळंबीकडे पाठ फिरवू शकतात. यामुळे भारताला जवळपास १ अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 10/Apr/2025