करजुवे खाडीतील वाळू चोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार डंपर ताब्यात

संगमेश्वर, ९ एप्रिल २०२५: संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीपट्ट्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मंगळवारी (ता. ८ एप्रिल) मध्यरात्री दोन ते तीन वाळू व्यावसायिकांनी ड्रेझरच्या साहाय्याने छुप्या पद्धतीने सुमारे ३०० ब्रास वाळूचा उपसा केला. ही वाळू रातोरात डंपरद्वारे हलवली जात असताना संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी करजुवे येथे धडक कारवाई करत चार डंपर ताब्यात घेतले. या कारवाईत ६० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महसूल विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मध्यरात्रीची कारवाई, वाळू माफियांवर धडक
करजुवे खाडी भागात गेल्या आठवड्यापासून वाळू चोरीच्या घटना वाढल्या होत्या. स्थानिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू असतानाच पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तातडीने मध्यरात्री करजुवे गाठून कारवाई केली. या कारवाईत ओली वाळू भरलेले चार डंपर जप्त करण्यात आले. वाळू चोरी करणारे माफिया घटनास्थळावरून पसार झाले असले तरी डंपर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राजेश रवींद्र चव्हाण (डेरवण, चिपळूण), विक्रम विलास महाडिक (मुरादपूर, चिपळूण), शुभम अजित चव्हाण (कळंबुशी, संगमेश्वर) यांचा समावेश आहे. एका डंपर चालकाची (क्र. MH 09 TC 0158) ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

६० लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत चार डंपर आणि त्यातील ओली वाळूसह एकूण ६० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळू माफियांनी ड्रेझरचा वापर करून खाडीतून बेसुमार वाळू उपसा केल्याचे उघड झाले आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील वाळू चोरीच्या वाढत्या प्रकारांचे द्योतक आहे.

महसूल विभाग अपयशी
या घटनेने संगमेश्वर तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. करजुवे तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी सुरू असताना त्यांना याची माहिती का नव्हती, असा सवाल उपस्थित होत आहे. आता महसूलमंत्री या प्रकरणात कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत महसूलमंत्र्यांनी वाळू चोरी होत असलेल्या भागातील तहसीलदारांना निलंबित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संगमेश्वर तहसीलदारांवर कारवाई होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाळू चोरी तात्पुरती थांबली
गेल्या महिन्यात करजुवे खाडी भागात पाच ते सहा वाळू माफियांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू होता. मात्र, तहसीलदारांवर कारवाईची घोषणा होताच हे चोरटे व्यवसाय तात्पुरते थांबले. यावरून महसूल विभागाला कारवाईची वेळ आल्यावर वाळू चोरी एका दिवसात थांबवता येते, हे सिद्ध झाले आहे.

स्थानिकांचा संताप, प्रशासनावर टीका
वाळू चोरीमुळे खाडी परिसराचे पर्यावरणीय नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले असल्याचा आरोपही होत आहे. या घटनेनंतर पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 10-04-2025