दापोली : मच्छी मार्केट स्थलांतर प्रश्न चर्चेतून सोडवू – महादेव रोडगे

दापोली : दापोलीत पर्यटन शहराचा दर्जा सुधारावा, स्वच्छता राहावी, यासाठी दापोली नगर पंचायतीच्या माध्यमातून बांधलेल्या नवीन इमारतीत मासळी विक्रेत्यांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. या बाबत विक्रेत्यांशी चर्चा करून मासळी मार्केट स्थलांतराचा प्रश्न चर्चेतून सोडवू, असे दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी ८ रोजी दापोली नगर पंचायत येथे बोलताना सांगितले. यासाठी सर्वपक्षीय आणि मासळी विक्रेते यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दापोली नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक, शहरातील, तालुक्यातील नागरिक, मासळी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दापोली शहरात उघडयावर असलेले मासळी मार्केट यामुळे होणारी दुर्गंधी, वाहतुकीस अडथळा, मासळी विक्रेत्यांना सोयी सुविधांचा अभाव, या बाबत वारंवार उपस्थित होत असलेल्या प्रश्नमुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दापोली येथे मासळी विक्रेते, चिकन, मटण विक्रेते यांच्या साठी नॅशनल डिव्हिजन बोर्ड च्या माध्यमातून निधी मंजूर करून इमारत बांधण्यात आली आहे.

या इमारतीत स्वच्छतागृह चिकन, मटण विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छतागृह, आधी सुविधा या नवीन इमारतीत आहेत. पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी काही सुविधांचा अभाव आहे असे असे मुद्दे चर्चेदरम्यान काहींनी मांडले, तर आहे, त्या ठिकाणी मासळी मार्केट बांधावे, असेही काहींनी सुचविले.

या संदर्भात कोळी बांधवांना विश्वासात घेऊन स्थलांतर विषय करावा, असे उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सांगितले.

मच्छीमारी व्यवसायाचा विचार करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे असे पत्रकार जगदीश वामकर यांनी बोलताना सांगितले. आहे ती जागा कित्येक वर्षांची जुनी, त्यामुळे त्या ठिकाणाहून मासळी विक्रेत्यांना उठवू नका, असे मत पी. एम. चोगले यांनी मांडले.

यावेळी मासळी विक्रेत्यांना उपजीविकेचे कार्ड द्या, असे अॅडव्होकेट संदेश मोरे यांनी सांगितले. तर आजची बैठक ही अंतिम नाही या बाबत एक समिती गठित करू आणि त्या समिती समोर नवीन इमारतीत सोयीसुविधा काय कमी आहेत, या बाबत चर्चा करून मार्ग काढू, असे अनेकांचे मत जाणून घेतल्यानंतर शेवटी रोडगे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 10/Apr/2025