रत्नागिरी : जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : सीपीआर प्रशिक्षण ही काळाची गरज आहे व सीपीआर कसा द्यायचा व कुणाला द्यायचा याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार कुंभार, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम सय्यद, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. याकामी विभागीय स्तरावरून कोल्हापूर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे, उप प्राचार्य डॉ. विनीत फाळके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण अंतर्गत सर्व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. पुढील टप्प्यात तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्व आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण होणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर सर्व विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभेद्वारे गावातील सर्व नागरिकांचे प्रशिक्षण हे जून २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार आहे.

काय आहे हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य प्रशिक्षण

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य आहे, जे अचानक हृदयविकार (Cardiac Arrest) किंवा श्वासोच्छ्वास थांबल्यास एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत, सिपीआर ( CPR) चे महत्त्व अनमोल आहे. अचानक हृदयविकार झाल्यास, वेळेवर सिपिआर केल्यास व्यक्तीचे जीवन वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा होत असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, सिपिआर चे ज्ञान आणि कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सीपीआर (CPR) चे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते एखाद्याचे जीवन वाचवू शकतील.

आवश्यकता : हृदय व फुफ्फुसांच्या पुनरुज्जीवनाचे (CPR) महत्त्व आणि गरज
हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यंत महत्त्वाचे जीवनरक्षक कौशल्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक थांबते किंवा श्वास घेणे बंद होते, तेव्हा CPR हे त्या व्यक्तीला वाचवण्याची संधी

महत्त्व : जीवन वाचवते, CPR रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह पुन्हा सुरू करून मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.

मेंदूचे नुकसान टाळते : हृदयाचे ठोके थांबल्यानंतर काही मिनिटांतच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्वरित CPR केल्याने हे नुकसान कमी करता येते.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मदत : रुग्णवाहिका येईपर्यंत CPR केल्याने रुग्णाला वाचण्याची शक्यता वाढते.

सामुदायिक प्रतिसाद : CPR चे ज्ञान समाजात पसरल्यास, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकते. यामध्ये अर्भकापासून ते मोठ्या व्यक्तीला सीपीआरची गरज पडते व तो कसा द्यायचा, याबाबत सर्वांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

सीपीआरची गरज केव्हा पडते : अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतिवापर

सर्वांनी सीपीआरचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. जेणेकरून वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत आपण एखाद्याचे जीवन वाचवू शकतो., असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 10/Apr/2025