गुहागर : गुहागर नगरपंचायतीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५६ लाख २२ हजार ९३८ रुपये इतकी कर वसुली केली आहे. वर्षाअखेरीस थकबाकी अत्यल्प असल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने समाधान व्यक्त केले. नगरपंचायतीने शहरात पथदीप, दररोजची स्वच्छता, पाणीपुरवठा नियमित ठेवण्यासाठी येणारी देखभाल दुरुस्ती यामुळे जास्तीत जास्त कर वसुलीचे धोरण आखले आहे.
नगरपंचायतीची मागील आर्थिक वर्षातील घरपट्टी वसुली ९६ टक्के झाली आहे. त्यामध्ये मालमत्ता कर, वीज कर व इतर कर धरून ३४ लाख ८३ हजार २२८ करापैकी ३३ लाख २७ हजार ९१८ रुपये वसुली झाली. पाणीपट्टीची रक्कम मात्र घरपट्टीपेक्षा १ टक्क्याने कमी झाली आहे. ते प्रमाण ९५ टक्के आहे. त्यामध्ये २४ लाख २३ हजार ८०५ पाणीपट्टीपैकी २२ लाख ९५ हजार २० रुपये वसूल झाले. गुहागर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी गेले महिनाभर घेतलेल्या प्रयत्नांमुळे समाधानकारक वसुली झाल्याचे मुख्याधिकारी सचिन चव्हाण यांनी सांगितले.
गुहागर नगरपंचायतीमधील कर वसुली चांगली झाली आहे. त्याप्रमाणे नागरिकांना सेवा द्यावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ शहरातील बाजारपेठ परिसरातील स्वच्छता दररोज केली जाते. गेले १० दिवस समुद्रचौपाटीचीही स्वच्छता झालेली नाही. तसेच अजूनही नगरपंचायतीची सक्षम पाणीयोजना पूर्ण झालेली नाही. मोडकाघर धरणामुळे शहराला मुबलक पाणीपुरवठा मिळत आहे
शहरात डासांचा प्रादुर्भाव
नगरपंचायतीकडून डास निर्मूलनासाठी गेल्या दोन वर्षांत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. सध्या बदलत्या वातावरणामुळे डासांचा प्रार्दुभाव होत आहे. वेळीच स्वच्छतेच्या उपक्रमांकडे लक्ष दिले नाही तर अडचणी निर्माण होतील, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 11/Apr/2025














