दापोली-खेड मार्गावरील दिशादर्शक फलकाची दुरवस्था

दापोली : दापोली आणि खेड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा दापोली-खेड हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर वाकवली येथे मुंबई, पुणे, कोल्हापूर, कराड, चिपळूण आणि रत्नागिरी शहरांच्या ठिकाणांचे अंतर दर्शवणारा दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. सध्या या दिशादर्शक फलकाची दुर्दशा झाली आहे. या दिशादर्शक फलकाचा काही भाग कोसळून पडला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत नामफलकाचा उर्वरित भाग हा कधीही कोसळणार आहे.

दापोली तालुक्यातून खंडमार्गे चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पाटण, कराड, सातारा, सांगली वाई, महाबळेश्वर, कोल्हापूर, पंढरपूर त्याचप्रमाणे महाड, पोलादपूर, पुणे, मुंबई आदी महत्त्वाच्या शहराकडे दररोज शेकडो प्रवासी खासगी तसेच सरकारी वाहनांसह मालवाहू वाहनेही या रस्त्यावरून ये-जा करत असतात. वाकवली गावाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाच्या शहरातील अंतर समजावे यासाठी दिशादर्शक फलक अनेक वर्षांपूर्वी उभारला आहे.

सध्या याच नामफलकाची दुर्दशा झाली असून, अर्धाअधिक फलक निखळून खाली पडला आहे. दिशादर्शक फलकाचा काही भाग अजूनही लोंबकळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नामफलक काढून टाकावी व मार्गदर्शक फलकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 14/Apr/2025