खेड शहरात गटारे, नाले सफाईची मोहीम

खेड : पावसाळ्यापूर्वीच्या कामांना खेड शहरात वेग आला असून मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांलगतची गटारे व नाल्यांची साफसफाई केली जात आहे. त्यामध्ये खेड-दापोली मार्गालगतची तुंबलेली गटारे स्वच्छ केली आहेत.

खेड शहरातील १७ प्रभागांमधील कचरा नियमित उचलला जात असला तरीही काहीवेळा कचरा गटारात साचून राहतो. गांधी चौकातील मुख्य नाला गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याने तुंबलेला होता. त्यावर प्लास्टिकयुक्त कचऱ्याचा थर साचलेला आहे. तसेच शिवतररोड, तहसील, वाणीपेठ, डाकबंगला, बाजारपेठ, टेलिफोन एक्ससेंज आदी ठिकाणची गटारे तुंबून त्यातून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याचा तेथील रिक्षा व हॉटेल्स व्यावसायिक, दुकानदार, ग्राहक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मुख्य व अतंर्गत रस्त्याजवळील गटारे-नाले स्वच्छ करण्यावर भर दिला आहे.

जुन्या पोलिस वसाहतलगतची गटारे मोकळी केली आहेत. शहरातील एसटी आगार, स्वरुपनगर येथील गटारे साफ करण्याची कामे हाती घेण्यात आली. याठिकाणी अडथळा ठरणाऱ्या महावितरणच्या भूमिगत वाहिनीबाबत पत्र देण्यात येणार आहे. गांधीचौकातील तुंबलेल्या मुख्य नाल्याची देखील जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 14/Apr/2025