चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये अत्याधुनिक फ्लो साइटोमेट्री सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी रामा पुरुषोत्तम फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने भरघोस मदत करत सामाजिक भान जपले आहे. ही सुविधा एका वातानुकूलित कक्षात उभारण्यात आली आहे. शास्त्रज्ञ डॉ. रिटा मुल्हेरकर या प्रयोगावर लक्ष ठेवणार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदानासाठी वालावलकर रुग्णालय कायमच अग्रेसर असते आणि सतत नवनवीन तंत्रज्ञान कोकणवासीयांच्या उपचारासाठी उपलब्ध व्हावे म्हणून फ्लो सायटोमेट्रीसारखी अद्ययावत सुविधा सुरू करण्याचा मानस प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या मशीनची उभारणी केली गेली आहे. या सुविधेमुळे रक्ताच्या नमुन्यातून अनेक प्रकारच्या आजारांचे निदान शक्य होणार आहे.
रक्तातील पेशींचे वर्गीकरण, रक्तविकारांचे कर्करोगाचे (हेमॅटोलॉजिकल), निदान आणि इम्युनोफेनोटायपिंग तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांची सीडी ४ पेशींची संख्या ज्यावरून त्यांच्यातील प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करून योग्य औषधांची निवड करणे शक्य होणार आहे जेणेकरून सीडी ४ संख्या अधिक कार्यक्षम व अचूक मिळणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन परिणाम अधिक जलद मिळू शकतात. प्रतिकारशक्तीशी निगडित आजारांचे अचूक निदान होऊ शकते.
विविध विषयांच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करणारे हे कोकणातील एकमेव तंत्रज्ञान रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. हे उपकरण कार्यान्वित करण्यासाठी लागणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि रिपोर्ट देणारे वैद्यकीय अधिकारी यांना निदान करताना मदत होणार आहे – डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 14/Apr/2025














